संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका मंगळवारी एका भीषण आणि अमानवी घटनेने हादरून गेला आहे. तालुक्यातील वडगावपान येथे शाळा सुटल्यानंतर आपल्या सायकलवरून घराकडे जात असलेल्या अवघ्या ११ वर्षीय चिमुरडीवर एका अज्ञात नराधमाने ऍसिड फेकून हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी जिल्हा परिषद शाळेत शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घराकडे निघाली होती. निर्जन रस्त्यावर दबा धरून बसलेल्या एका अज्ञात इसमाने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले आणि काही समजण्यापूर्वीच तिच्या चेहऱ्यावर घातक ज्वलनशील पदार्थ फेकून पळ काढला. या हल्ल्यात मुलीचा चेहरा आणि शरीराचा काही भाग भाजला असून तिला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असली तरी या घटनेमुळे झालेल्या शारीरिक आणि मानसिक जखमा भरून येणे कठीण आहे.
पीडित मुलीची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. या घटनेची माहिती मिळताच वडगावपान ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. “माझ्या लेकीचा गुन्हा काय? नराधमाला भरचौकात फाशी द्या,” असा आक्रोश करत पीडितेच्या आईने न्यायाची मागणी केली आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पीडितेच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
संगमनेर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित व्यक्तींची कसून चौकशी सुरू असून आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या अमानवी कृत्यामुळे सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.




