नाशिक : प्रतिनिधी
कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील तपासासाठी विशेष चौकशी समितीने (SIT) पाठवलेल्या समन्सला उत्तर देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी चौकशीला हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. “मी महिला आहे आणि प्रवासासाठी जास्त वेळ लागतो,” असे अजब कारण देत त्यांनी नाशिक येथे चौकशीला येण्यास नकार दिला आहे.
नेमकी बातमी काय? अशोक खरात यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नाशिक येथील पोलीस अकादमीत SIT ची प्रक्रिया सुरू आहे. या तपासाचा भाग म्हणून रूपाली चाकणकर यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, चाकणकर यांनी लेखी स्वरूपात कळवले आहे की, पुणे ते नाशिक या प्रवासासाठी बराच वेळ जात असल्याने त्या चौकशीला हजर राहू शकत नाहीत. त्याऐवजी मुंबई किंवा पुणे अशा गोपनीय ठिकाणी आपली चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते.
SIT ला कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत?
-
कॅप्टन खरात यांच्याशी चाकणकर यांची ओळख कधी आणि कशी झाली?
-
खरात यांनी जमा केलेल्या मालमत्तेत चाकणकर यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का?
-
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा वापर करून खरात यांना कोणताही आर्थिक लाभ मिळवून दिला गेला का?
-
खरात यांचे सीए ललित पोफळे यांच्याशी चाकणकर यांचा काय संवाद झाला?
-
खरात यांनी पुणे, मुंबई आणि नोयडा येथे घेतलेल्या जमिनींच्या व्यवहारात चाकणकर संबंधित आहेत का?
अंजली दमानिया यांची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. “एकीकडे सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या चाकणकर आता चौकशीच्या वेळी ‘महिला’ असल्याचे आणि प्रवासाचे कारण देत आहेत, हे हास्यस्पद आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. जर त्या चौकशीला सहकार्य करत नसतील, तर कायद्यानुसार बेलेबल किंवा नॉन-बेलेबल वॉरंट काढून त्यांना चौकशीला आणण्याची तरतूद असल्याचेही दमानिया यांनी स्पष्ट केले.
सध्या रूपाली चाकणकर नेमक्या कोठे आहेत, याबाबत अधिकृत माहिती मिळत नसून, त्या अज्ञात स्थळी असल्याचे बोलले जात आहे. SIT आता पुढील काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



