मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लॉकडाऊन लागणार असल्याच्या खोट्या बातम्या आणि मेसेजेस वेगाने व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून अशा अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
मध्य पूर्वेतील तणाव आणि जागतिक परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाई निर्माण होईल आणि त्यातून लॉकडाऊन लागेल अशा आशयाचे मेसेजेस व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर फिरत होते. यामुळे मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील अनेक शहरांमधील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी इंधन भरण्यासाठी तुफान गर्दी केली होती. या ‘पॅनिक बाइंग’मुळे विनाकारण गोंधळ निर्माण होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की देशात किंवा राज्यात लॉकडाऊन लागण्याची कोणतीही शक्यता नाही. केंद्र सरकारनेही यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले असून नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की फेसबुक, एक्स (ट्विटर) किंवा व्हॉट्सॲपवर लॉकडाऊन संदर्भात खोटी माहिती पसरवणे आता गंभीर गुन्हा मानला जाईल. अफवा पसरवणारे व्हिडिओ तयार करणे किंवा आलेले मेसेजेस खातरजमा न करता फॉरवर्ड करणे या दोन्ही कृतींवर सायबर सेल आणि स्थानिक पोलीस कडक लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे मुंब्रा परिसरात अशाच प्रकारची अफवा पसरवणारा व्हिडिओ तयार करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. राज्याकडे पुढील किमान एक महिना पुरेल इतका पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा साठा उपलब्ध असून नागरिकांनी इंधन संपण्याच्या भीतीपोटी पंपांवर गर्दी करून कृत्रिम टंचाई निर्माण करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अधिकृत सरकारी निर्णयाशिवाय कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.







