रत्नागिरी : प्रतिनिधी
गोव्याच्या स्वस्तिक कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण स्वरप्रतिभा’ या कोकणस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या ऋग्वेद प्रवीण तेरेदेसाई याने प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाचा मान मिळवला आहे. गोवा कला अकादमीच्या ‘कृष्ण कक्षा’त उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, गोवा तसेच कर्नाटकातील कारवार ते मंगळूर या भागांतील ७ ते १५ वयोगटातील बालकलाकार सहभागी झाले होते. ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी १५ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये रत्नागिरीच्या ‘स्वराभिषेक’ संगीत वर्गाचा शिष्य असलेल्या ऋग्वेदने बाजी मारली. गुरू सौ. विनया परब यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवणाऱ्या ऋग्वेदने अंतिम फेरीत मध्य झपतालात बद्ध ‘वृंदावनी सारंग’ रागातील बंदिश आणि त्रितालातील एक छोटा ख्याल सादर करत, आपल्या सफाईदार आलाप, ताना आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत गोव्याची वैभवी प्रभाकर भट हिने द्वितीय, तर स्वरा शैलेश शिरोडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला, तसेच मोक्ष जितेन कटारिया व श्रीयश परब यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांचा रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी सतीश नाईक, राहुल अईर, सारंग केरकर यांनी तबलासाथ तर वसंत गावकर, समृद्धी नाईक, प्रणय पार्सेकर यांनी संवादिनीसाथ केली. स्पर्धेचे परीक्षण समीक्षा काकोडकर, सम्राज्ञी शेलार अईर आणि सुभाष फातर्पेकर यांनी केले, तर यावेळी पी. के. मुखर्जी, डॉ. अजित म्हापणे, कायतानो कार्व्हालो आणि डॉ. प्रवीण गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.



