रत्नागिरी : प्रतिनिधी
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला. रत्नागिरी शहराला आणि जिल्ह्याला जागतिक स्तरावर एक वेगळी आणि उज्ज्वल ओळख निर्माण करून देण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने संपूर्ण प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू बागायतदारांना शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार ६२८ बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपयांची मदत थेट जमा करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती डॉ. सामंत यांनी दिली. यासोबतच जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चून अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कामावर भर दिला जात आहे. विमानतळ, पर्यटनवाढ, रोजगार निर्मिती आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून रत्नागिरीचे भविष्य अधिक गतिमान करण्यासाठी आपण स्वतः आणि प्रशासन कटिबद्ध असल्याचेही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्पष्ट केले.



