रत्नागिरी : दिपक भागवत
वशिष्ठी खोऱ्यातील एका प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्याशी संबंधित असलेल्या संस्थेच्या कार्यालयावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अचानक धाड टाकल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काल रात्रीपासूनच ही धडक कारवाई सुरू असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
अन्न व औषध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने काल रात्रीपासून या संस्थेच्या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, अंतर्गत नोंदी, उपलब्ध साठा आणि इतर साहित्याची कसून तपासणी सुरू ठेवली आहे. अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या धाडीमागील नेमके कारण अद्याप प्रशासनाकडून अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, या सखोल तपासणीमुळे या प्रकरणातील ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असे मानले जात आहे.
एकीकडे प्रशासनाची कारवाई वेगात सुरू असतानाच, दुसरीकडे या संस्थेचा सर्वेसर्वा असलेल्या संबंधित राजकीय नेत्याकडून एफडीएची ही कारवाई दाबण्याचा किंवा थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याची कुजबुज परिसरात सुरू आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले असून वशिष्ठीच्या खोऱ्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
या कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाला नेमके काय आढळले, कोणत्या प्रकारच्या अनियमिततेचा संशय आहे आणि आगामी काळात संबंधितांवर कोणती कायदेशीर पावले उचलली जाणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकृत पत्रकाची आणि भूमिकेची सर्वांना प्रतीक्षा असून, अन्न व औषध विभागाच्या या पावलामुळे येत्या काही दिवसांत आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



