रत्नागिरी : प्रतिनिधी
निसर्गरम्य कोकण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कुटुंबावर रत्नागिरीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पोहताना पालघर येथील दोन पर्यटक समुद्रात ओढले गेले. या दुर्घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसऱ्या पर्यटकाला स्थानिकांनी जीवाची बाजी लावून वाचवले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर येथील भानुशाली कुटुंब वीकेंडच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीत आले होते. रविवारी सकाळी हे कुटुंब आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले. यावेळी समुद्रातील लाटांचा आणि पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली हे दोघेही पाण्यात बुडू लागले.
दोघेही पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहून किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरड केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि आरे-वारेचे पोलीस पाटील आदेश कदम यांनी प्रसंगावधान राखत तातडीने समुद्रात धाव घेतली. त्यांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने संतोष भानुशाली यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. सुयोग भानुशाली यांना वेळेवर मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
प्रशासनाचे आवाहन
सध्या सुट्ट्यांचा हंगाम असल्याने कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, भरती-ओहोटीचा आणि समुद्रातील प्रवाहांचा अंदाज नसल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. पर्यटकांनी अतिसाहस टाळावे आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रत्नागिरी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.



