मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तिखट शब्दांत भाष्य केले आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गुलामांचा बाजार मांडला आहे. हे सर्व पाहून मला शिसारी येतेय,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, यावेळी मंचावर शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
माणसांचे लिलाव सुरू आहेत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, “पूर्वीच्या काळी बाजारात गुलामांचे लिलाव व्हायचे, तसे आज महाराष्ट्रात माणसांचे आणि लोकप्रतिनिधींचे लिलाव सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही घडले, ते पाहून अक्षरशः किळस आली. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणात थोडी लवचिकता लागते हे मान्य आहे, पण ही लवचिकता स्वार्थासाठी नसावी.”
बाळासाहेब असते तर त्यांना वेदना झाल्या असत्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे भावूक झाले. “आज बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत, हेच एका अर्थी चांगले झाले. जर आज ते असते आणि महाराष्ट्राची ही अवस्था पाहिली असती, तर त्यांना कमालीच्या वेदना झाल्या असत्या. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली, तिथे आज फक्त सत्तेसाठी सुरू असलेला हा नंगा नाच पाहून मन विषण्ण होते,” असेही त्यांनी नमूद केले.
दोन व्यापाऱ्यांचे गुलाम होणार नाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिल्लीतील ‘दोन व्यापाऱ्यांचा’ उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला होता. त्यालाच पुष्टी देत राज ठाकरे यांनीही, “मी मेलो तरी बेहत्तर, पण कोणाचे गुलाम म्हणून जगणार नाही,” असे ठणकावून सांगितले. राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी बऱ्याच काळानंतर सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र येत महायुती सरकारवर टीका केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.




