पनवेल:
खेळत असलेल्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुकलीला प्रलोभन दाखवून सार्वजनिक महिला शौचालयात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना पनवेल शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत २४ वर्षीय आरोपी सफाई कर्मचाऱ्याला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पीडित चिमुरडी घराच्या परिसरात खेळत होती. त्यावेळी तेथे काम करणाऱ्या २४ वर्षीय आरोपी सफाई कर्मचाऱ्याची नजर तिच्यावर पडली. त्याने चिमुकलीला हातवारे करून जवळ बोलावले आणि प्रलोभन दाखवून तिला सार्वजनिक महिला शौचालयात नेले. तेथे दरवाजा आतून बंद करून त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याच वेळी शौचालय परिसरातील संशयास्पद हालचाली एका स्थानिक नागरिकाच्या निदर्शनास आल्या. संशय आल्याने त्यांनी तातडीने शौचालयाचा दरवाजा ठोठावत आत काय सुरू आहे, अशी विचारणा केली. आवाज ऐकून परिसरातील इतर नागरिकही घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी दरवाजा उघडण्याचा आग्रह धरला. दरवाजा उघडताच आतून अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतील चिमुकली बाहेर आली, तर आरोपी दरवाजामागे लपण्याचा प्रयत्न करत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच संतप्त नागरिकांनी आरोपीला जागीच पकडून चांगलाच चोप दिला आणि तातडीने पोलिसांना पाचारण केले. पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पनवेल परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणे, शौचालयांचा परिसर आणि कमी वर्दळीच्या भागांमध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी आक्रमक मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.



