बारामती :
बारामतीमध्ये पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका हवालदाराविरुद्ध महिला वकिलाने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरफायदा घेतल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी पोलीस हवालदार रमेश मोहन जाधव याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कायदेशीर कारणास्तव पीडित महिला वकिलाची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन फिर्यादीशी जवळीक वाढवली होती. त्यानंतर नातेवाइकांसह तिच्या घरी जाऊन विवाहाची चर्चा केल्याने पीडितेचा त्याच्यावर विश्वास बसला. काही दिवसांनी आरोपीने एका मंदिरात स्वतःच्या गळ्यातील साखळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून घातली आणि ‘तू माझी कायदेशीर पत्नी आहेस’ असे सांगून जेऊर व निंभोरे परिसरात पत्नी म्हणून तिचा परिचय करून दिला. या सहजीवनादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली.
गर्भधारणेनंतर आरोपीच्या वर्तनात बदल झाला आणि त्याने कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. २० डिसेंबर २०२५ रोजी पीडितेने एका मुलीला जन्म दिला, मात्र आरोपीने मुलगी आणि पत्नीचा स्वीकार करण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस अधिक तपास करत असून कॉल डिटेल्स, व्हॉट्सॲप चॅट, सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.



