नाशिक :
विद्यापीठांनी केवळ पदवीधर विद्यार्थ्यांची फौज तयार न करता त्यांच्यातील नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योग आणि स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम ‘इनक्युबेशन सेंटर’ उभारण्याची गरज आहे. भविष्यात विद्यापीठांमधूनच नवे उद्योग आणि युनिकॉर्न निर्माण झाले पाहिजेत, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा सायन्समुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे आणि वेगाने बदल होत आहेत, याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांना केवळ पदवी देऊन चालणार नाही, तर त्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे कौशल्याधारित शिक्षण देणे काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक उपकेंद्राने डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर आणि क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक व भविष्यातील रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाशिकच्या वाढत्या औद्योगिक विकासाचा आणि क्षमतेचा आवर्जून उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, नाशिकमध्ये कृषी, विशेषतः द्राक्ष उत्पादन आणि निर्यात, अन्नप्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी, एरोनॉटिक्स, फार्मास्युटिकल्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. गेल्या केवळ दोन वर्षांत नाशिकमध्ये उत्पादन व औद्योगिक क्षेत्रात तब्बल ३० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक झाली आहे. या वाढत्या गुंतवणुकीमुळे आणि विकासकामांमुळे येत्या पाच वर्षांत मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक हे महाराष्ट्राचे नवे आणि अत्यंत महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून वेगाने उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराला दर्जेदार आणि रोजगारक्षम मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मोठी मदत मिळणार आहे. आधुनिक शिक्षण आणि संशोधनाला चालना देत हे उपकेंद्र नाशिकच्या विकासाला एक नवी दिशा देईल. तसेच, येत्या काळात नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजनातही या उपकेंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रभावी वापर कसा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
या दिमाखदार लोकार्पण सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, खासदार भास्कर भगरे तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



