मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील चेंबूर आणि साकीनाका येथे झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातांमुळे जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या व्हिडिओमध्ये अमित साटम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना “साहेब, काल झाडावर होते, आज मॅनहोल झाले” असे म्हणत हसताना दिसत असल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. या व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादानंतर अमित साटम यांनी तात्काळ समोर येत आपली बाजू मांडली असून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना साटम यांनी स्पष्ट केले की, ते मॅनहोल दुर्घटनेबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना तिथे आमदार जयंत पाटील आले आणि त्यांनी साटम यांच्या आदल्या दिवशीच्या भाषणाचा उल्लेख केला; ज्यावर प्रतिक्रिया देताना साटम यांनी पाटलांना सांगितले की, कालचे भाषण झाड कोसळून झालेल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत होते, तर आजचा विषय मॅनहोलमध्ये पडून झालेल्या नागरिकाच्या मृत्यूशी संबंधित आहे, म्हणजेच हे दोन्ही पूर्णपणे वेगळे विषय आहेत. हे ऐकून जयंत पाटलांनी त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि ते हसत पुढे गेल्यानंतर केवळ एक राजकीय शिष्टाचार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केले होते, असे साटम यांनी सांगितले. दोन वेगवेगळ्या संदर्भांची एकत्र जोडणी करून अर्थाचा अनर्थ केला जात असल्याचा आरोप करत माध्यमांनी अशा मनघडंत बातम्या पसरवू नयेत आणि जे सत्य आहे तेच समोर आणावे, असे आवाहन साटम यांनी या वेळी केले.



