मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत जलसंधारण आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. राज्यातील जलसंपदा आणि जलसंधारण खात्याचा कारभार भाजप नेते मोहित कंबोज चालवत असून, त्यांच्या संमतीशिवाय या विभागात एक पानही हलत नाही, असा दावा दानवे यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेचे दोन टप्पे यशस्वी झाल्याचे सरकार सांगत असले, तरी राज्यातील हजारो गावांमध्ये अजूनही टँकरने पाणी पुरवले जात असल्यामुळे ही योजना केवळ कंत्राटदारांची घरे भरण्यासाठीच सुरू आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या खात्यातील अधिकाऱ्यांना एखाद्या कामाबद्दल विचारले असता, ते थेट मोहित कंबोज यांना फोन करण्यास सांगतात असे सांगत दानवे यांनी या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आपल्याकडे एका बड्या अधिकाऱ्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग पुरावा म्हणून उपलब्ध असल्याचे ठणकावून सांगितले, ज्यामुळे सभागृहात सत्ताधारी भाजप आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी व थयथयाट पाहायला मिळाला.



