मुंबई :
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतताना तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आता सुखरूप काठमांडूकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच लक्ष घालत केलेल्या तातडीच्या मदतीमुळे या सर्व भाविकांचा परतीचा प्रवास सुरळीत झाला आहे.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र, परतीच्या प्रवासादरम्यान अचानक ते तिबेटमधील सागा येथे अडकून पडले. या भाविकांचे काठमांडूहून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित होते. त्यामुळे पुढील प्रवास करण्यासाठी त्यांना वेळेत काठमांडू गाठणे अत्यंत गरजेचे होते.
परदेशात भाविक अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी त्वरित भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून या भाविकांसाठी आवश्यक ती मदत आणि सहकार्य मिळवले. केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे आज सकाळी ६ वाजता हे सर्व भाविक सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे नेपाळच्या काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.
परदेशात संकटात सापडलेले असताना राज्य सरकार आणि केंद्राने तातडीने धाव घेत केलेल्या या मदतीबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



