मुंबई : प्रतिनिधी
मंत्रालयात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील आशा स्वयंसेविका तसेच २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी (राष्ट्रीय आरोग्य अभियान) कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांच्यासह पतसंस्था कर्मचारी, रेशन दुकानातील कामगार, खासगी शाळांचे कर्मचारी, स्वयंरोजगार संस्था आणि वाचनालयातील कर्मचारी अशा २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विविध घटकांना या योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.सद्यस्थितीत राज्यात सुमारे ८४ हजार आशा सेविका कार्यरत असून, त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे मोठे काम करत आहेत. ही विमा योजना लागू झाल्यास आशा सेविकांसह इतर सर्व अल्प मानधनावरील घटकांना वैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षिततेचा एक मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या उच्चस्तरीय बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त रमेश चव्हाण, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक व आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि राज्य कामगार विमा योजनेचे संचालक सोहम वायाळ प्रामुख्याने उपस्थित होते.




