मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून दूर राहून समाजहितासाठी समर्पित कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून, अशा असामान्य व्यक्तींची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठीत करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय समितीमार्फत विविध प्रस्तावांची सखोल छाननी करून अंतिम शिफारसी निश्चित केल्या जाणार आहेत, जेणेकरून २६ जानेवारी २०२७ रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पात्र आणि गुणवंत व्यक्तींना स्थान मिळेल. कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य, विज्ञान, कृषी, उद्योग, पर्यावरण आणि लोकसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबवली जात असून, या बैठकीस समितीचे सदस्य म्हणून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले आणि राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे उपस्थित होते.



