पुणे :
पुणे परिसरातील निसर्गरम्य कात्रज घाटात भारतीय जनता पक्षाचे हजारो किलो वजनाचे न वापरलेले प्रचार साहित्य उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात प्रामुख्याने भाजपचे झेंडे, टोप्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट कचऱ्यात टाकल्याचे आढळून आले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात अशा प्रकारे राजकीय कचरा केल्यामुळे स्वच्छतेचा आणि पर्यावरणाचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे शहरभर स्वच्छतेचे धडे देत नागरिकांना कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे राजकीय पक्षाचे असे बेजबाबदार वर्तन समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंग यांनी या घटनास्थळाची पाहणी केली आणि या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून लक्ष वेधले. नुसती टीका न करता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन घाटातील हे सर्व टाकून दिलेले साहित्य गोळा करत परिसराची स्वच्छता केली. पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या कात्रज घाटात अशा प्रकारे प्रचार साहित्याची विल्हेवाट लावणे हा मोठा बेजबाबदारपणा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
निवडणुकीच्या प्रचारासाठी लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या साहित्याची योग्य विल्हेवाट किंवा पुनर्वापर करणे अपेक्षित असते. मात्र, संबंधित यंत्रणेने ते थेट मोकळ्या जागेत फेकल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या संतापजनक प्रकारावर महापालिका प्रशासनाने हात झटकले असून हा परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, हवेली तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.



