कर्नाटक : कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या येत्या शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्वाने ७७ वर्षीय सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका आणि राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात सत्तावाटपाचा ‘अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला’ लागू करण्यासाठी शिवकुमार गटाकडून सिद्धरामय्यांवर दबाव वाढवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यासोबत दिवसभर मॅरेथॉन बैठक पार पडली. अधिकृत अजेंड्यानुसार ही बैठक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांवर चर्चेसाठी आयोजित करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात राज्यातील सत्तासमीकरणांवरच सर्वाधिक चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी आपल्या निकटधर्मीय मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी या सर्व चर्चा केवळ तर्क-वितर्क असल्याचे म्हटले असून, बैठकीत नेतृत्वबदलावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर स्वतः सिद्धरामय्या यांनीही या वृत्ताला दुजोरा देण्यास नकार दिला आहे.



