चेन्नई: T20 विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी मोठा विजय मिळवला. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) रंगलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला, तर गोलंदाजांनी झिम्बाब्वेला रोखण्यात यश मिळवले. या विजयासह भारताने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २५६ धावांचा डोंगर उभा केला. हा भारताचा T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. सलामीवीर अभिषेक शर्माने ३० चेंडूत ५५ धावांची स्फोटक खेळी करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर हार्दिक पांड्याने अवघ्या २३ चेंडूत नाबाद ५० धावा कुटल्या, तर तरुण फलंदाज टिळक वर्माने केवळ १६ चेंडूत नाबाद ४४ धावांची आक्रमक खेळी करत धावसंख्येला २५० च्या पार नेले. कर्णधार सूर्यकुमार यादव (३३ धावा) आणि इशान किशन (३८ धावा) यांनीही मोलाचे योगदान दिले.
२५७ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत ६ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. झिम्बाब्वेकडून सलामीवीर ब्रायन बेनेटने एकाकी झुंज देत ५९ चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही मोठी साथ मिळाली नाही. भारताकडून अर्शदीप सिंगने उत्कृष्ट गोलंदाजी करत २४ धावांत ३ बळी टिपले. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
या विजयामुळे झिम्बाब्वेचा संघ विश्वचषकातून बाहेर पडला असून भारतासाठी आता १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा सामना ‘व्हर्च्युअल क्वार्टर फायनल’ ठरणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.



