मुंबई (प्रतिनिधी):
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव आणि २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी (९ मार्च २०२६) राज्य सरकारला हे निलंबन तात्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे गेल्या १० दिवसांपासून प्रशासकीय वर्तुळात सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला आणि ब्रिफिंगला देवेंद्र सिंह अनुपस्थित राहिल्याने मंत्री मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. लोकप्रतिनिधींचा आणि सभागृहाचा अवमान झाल्याचा ठपका ठेवत तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी २७ फेब्रुवारी रोजी सिंह यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते.
सोमवारी विधानसभेत संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र सिंह यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपल्या अनुपस्थितीबाबत लेखी स्पष्टीकरण आणि पुरावे सादर केले आहेत. तसेच, घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशा चुका होणार नाहीत, असे आश्वासन दिले आहे.
या दिलगिरीनंतर आणि सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देवेंद्र सिंह आणि सहसंचालक सतीश पडवळ यांचे निलंबन मागे घेण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात याला संमती दर्शवली असून, सरकार आता या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर पुन्हा रुजू करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
एका आयएएस अधिकाऱ्याचे थेट सभागृहात निलंबन होण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात होती. मात्र, आता निलंबन रद्द झाल्याने देवेंद्र सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



