नवी दिल्ली : न्यूज एजन्सी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची कडक व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्नपदार्थांची हाताळणी, प्रक्रिया आणि पॅकेजिंग दरम्यान केवळ ‘फूड-ग्रेड’, विषमुक्त आणि गंजमुक्त सुऱ्या, ब्लेड तसेच कापण्याच्या इतर उपकरणांचा वापर करणे अनिवार्य असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, काही अन्न व्यवसायांमध्ये गंजलेल्या, तडे गेलेल्या, खराब झालेल्या किंवा रंग उडालेल्या सुऱ्या आणि कापण्याच्या साधनांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. अशा उपकरणांमुळे अन्नामध्ये भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजैविक दूषितीकरण (contamination) होण्याची शक्यता असते, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
अन्नपदार्थ तयार करणे, त्यावर प्रक्रिया करणे, पॅकेजिंग आणि साठवणुकीसाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे तसेच अन्नाचा थेट संपर्क येणारे पृष्ठभाग हे फूड-ग्रेड आणि गंजमुक्त दर्जाचे असणे आवश्यक आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभालीवर विशेष भर देण्यात आला आहे. गंज लागलेली, तडे गेलेली, रंग उडालेली किंवा इतर दोष असलेली उपकरणे त्वरित बदलण्याच्या सूचनांसह अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता आणि सुरक्षेच्या सर्व मानकांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ तसेच संबंधित नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. राज्य अन्न सुरक्षा आयुक्त, परवाना प्राधिकरण आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणी दरम्यान विशेष दक्षता घेण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक व कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

