देवरुख : प्रतिनिधी
कोसुंब-ताम्हाने मार्गावर बुधवारी दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत आंबवली येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतीक प्रमोद सावंत असे या मृत तरुणाचे नाव असून, ऐन तारुण्यात काळाने झडप घातल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी प्रतीक सावंत हे आपल्या दुचाकीवरून जात असताना चिरे वाहून नेणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये प्रतीक सावंत हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे आंबवली गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिकांमधून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोसुंब-ताम्हाने मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणावर चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकची वाहतूक सुरू असते. या ट्रकचालकांवर प्रशासनाचा किंवा पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसून, हे ट्रक अत्यंत भरधाव वेगाने हाकले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवजड वाहतूक करणाऱ्या या वाहनांचे फिटनेस, परवाने आणि इतर आवश्यक कागदपत्रांची संबंधित विभागाकडून नियमित तपासणी होते का, असा संतप्त सवालही आता उपस्थित केला जात आहे.
चिरे वाहतूक करणाऱ्या या भरधाव ट्रक्समुळे या मार्गावर वारंवार अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. निष्पाप लोकांचे बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने आणि पोलिसांनी तातडीने या वाहनांची कडक तपासणी करून त्यांच्या वेगावर नियंत्रण आणावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोसुंब-ताम्हाने मार्गावरील अवजड वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



