दापोली : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली भागात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अघोषित आणि वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी महावितरण प्रशासनाविरोधात एक अनोखे आंदोलन छेडले आहे. सतत वीज गुल होणे आणि कमी दाबाने (लो-व्होल्टेज) वीजपुरवठा होण्याच्या समस्येला कंटाळून स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दापोली येथील महावितरण कार्यालयातच चटया अंथरून थेट ‘झोपून आंदोलन’ सुरू केले. वारंवार होणाऱ्या ट्रिपिंगमुळे आणि अघोषित वीज कपातीमुळे सर्वसामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, कडक उन्हाच्या या दिवसांत रात्रीची झोप घेणेही कठीण झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या गंभीर समस्येबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्राहकांना हे पाऊल उचलावे लागले. कार्यालयात झोपूनच आंदोलकांनी महावितरण प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला.



