खेड : प्रतिनिधी
खेड एसटी आगारातील नियोजनशून्य व मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने खेड एसटी बस स्थानकावर जोरदार धडक आंदोलन करण्यात आले. भाजप नेते आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. वाढत्या दबावामुळे अखेर आगार प्रशासनाने मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
ग्रामीण भागातून खेड शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेल्या बसेस वेळेवर धावत नसल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेकदा अधिकृत थांब्यावर विद्यार्थी उभे असूनही चालक बसेस न थांबवता पुढे नेतात. तसेच रात्रवस्तीच्या बसेस वेळेवर न सुटणे आणि काही एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी अरेरावी केली जात असल्याच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या भाजपने थेट आगारातच जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरले आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली.
आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता खेड आगार व्यवस्थापकांनी भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांना लेखी पत्र देत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यापुढे विद्यार्थ्यांसाठी निर्धारित वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येतील, सर्व अधिकृत थांब्यांवर बसेस थांबवल्या जातील आणि प्रवाशांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच बस स्थानकातील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचेही मान्य करण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असले तरी, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र लढा उभारण्याचा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



