बीड :
अनेक दशकांपासून रेल्वेच्या नकाशापासून दूर असलेल्या बीड जिल्ह्यातील नागरिकांचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर साकार झाले आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बहुप्रतिक्षित ‘बीड-पुणे’ थेट रेल्वे सेवेला हिरवी झेंडी दाखवून या सेवेचा भव्य शुभारंभ केला. ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’च्या ऐतिहासिक औचित्यावर सुरू झालेली ही रेल्वे सेवा बीडकरांसाठी एक मोठी आणि आनंददायी भेट ठरली आहे. मराठवाड्याची कन्या या नात्याने हा संकल्प पूर्ण करताना आपल्याला अत्यंत अभिमान वाटत आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
उल्लेखनीय आहे की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ करताना बीडकरांना शब्द दिला होता की, पुढील वर्षापर्यंत ते थेट पुण्यापर्यंतचा प्रवास करू शकतील. आज तोच शब्द पूर्ण करत या थेट रेल्वे सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. अनेक दशके रेल्वेची सुविधा नसल्यामुळे येथील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेल्या या सेवेमुळे आता या सर्व घटकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या वेळेची आणि पैशांचीही मोठी बचत होणार आहे.
या दिमाखदार सोहळ्याला खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



