बदलापूर : बदलापूर पूर्वेकडील जुवेली गाव परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महिलेसह पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख मनिषा भोसले अशी झाली असून ती बदलापूरजवळच कुटुंबासोबत राहत होती, तर मृत पुरुष गणेश शिंदे हा घाटकोपर येथील रहिवासी असून तो कॅब चालक होता. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषाच्या तीन वर्षांच्या लहान मुलाने “आपल्या आईला कॅब चालकानेच मारले” असा धक्कादायक जबाब दिला आहे. मात्र, कॅब चालक गणेश शिंदे याची हत्या कोणी केली की त्याने स्वतः आत्महत्या केली, याचे गूढ अजूनही कायम असून अधिक तपासानंतरच सत्य समोर येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मनिषाच्या कुटुंबीयांनी आपण गणेशला ओळखत नसल्याचे आणि तो आपल्या संपर्कात नसल्याचे सांगितले आहे. सध्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले असून, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; तसेच या दोघांचा नेमका काय संबंध होता आणि ते येथे कशासाठी आले होते, या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.







