धाराशिव :
धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कुस्तीच्या मैदानात भल्याभल्यांना धूळ चारणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन चिमुकल्या मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून शंभर फूट खोल दरीत उडी घेतली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीने उपचारादरम्यान प्राण सोडले. तर जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा हिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
कुस्तीच्या आखाड्यात कधीही हार न मानणाऱ्या अश्विनी यांनी आयुष्याच्या आखाड्यात मात्र असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे धक्कादायक कारण आता समोर येत आहे. अश्विनी यांचे पती आणि सासरच्या मंडळींकडून त्यांना सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी केला आहे. सासरच्या या जाचाला कंटाळूनच तिने आपली जीवनयात्रा संपवल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. स्थानिक पोलीस या आरोपांच्या अनुषंगाने प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या रहिवासी असलेल्या अश्विनी मोहिते (विवाहानंतर पौळ) यांनी आपल्या कारकिर्दीत राज्याला आणि देशाला अनेक पदके मिळवून दिली होती. कुटुंबातूनच मिळालेल्या कुस्तीच्या बाळकडूमुळे त्यांनी २००७ मध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर २००८ आणि २००९ मध्येही त्यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. आपल्या संपूर्ण क्रीडा कारकिर्दीत पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा मान उंचावणाऱ्या या ‘वाघिणीचा’ असा करुण अंत झाल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



