वाशिम : गुन्ह्याच्या कबुलीबाबासाठी पोलिस कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी, रिसोडच्या तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अखेर पीडित कुटुंबाच्या पदरात न्याय पडला. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेप सुनावलेल्यांमध्ये रिसोडचे तत्कालीन ठाणेदार माधव माणिक धांडे यांच्यासह, पोलिस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या नोंदींनुसार, बेग्या पवारच्या शरीरावर मारहाणीच्या ४४ खुणा आढळल्या होत्या. अमानुष मारहाण, अतिरक्तस्राव, त्याचा बसलेला मानसिक धक्का, यामुळे त्याचा मृत्यू झाला. कोठडीत मारहाण केल्यानंतर त्याला वाशिम येथे आणत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले होते.



