नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर एकाच रँकवर दोन उमेदवारांनी दावा केल्याने मोठी खळबळ उडाली होती. AIR ३०१ या रँकवर ‘आकांक्षा सिंग’ नावाच्या दोन तरुणींनी आपला हक्क सांगितल्याने प्रशासकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर UPSC ने अधिकृत पत्रक काढून या वादावर पडदा टाकला असून गाझीपूरच्या आकांक्षा सिंगनेच ही बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, निकाल लागताच बिहारच्या आरा येथील आकांक्षा सिंगने माध्यमांसमोर येत आनंद साजरा केला होता. ती रणवीर सेनेचे संस्थापक ब्रह्मेश्वर मुखिया यांची नात असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तिचे सर्वत्र अभिनंदन होऊ लागले. मात्र, त्याच वेळी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील डॉ. आकांक्षा सिंग हिने देखील ३०१ रँक आपलीच असल्याचा दावा केला आणि बिहारच्या आकांक्षावर पुराव्याविना रँक चोरल्याचा गंभीर आरोप केला. दोन्ही उमेदवारांकडे असलेल्या प्रवेशपत्रांवर एकच रोल नंबर (०८५६७९४) दिसत असल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला होता.
जेव्हा अधिकृतरीत्या QR कोड स्कॅनिंग आणि डेटाबेसची सखोल तपासणी करण्यात आली, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. गाझीपूर येथील डॉ. आकांक्षा सिंग हीच खरी रँक होल्डर असल्याचे आयोगाने जाहीर केले असून तिचे वडील रणजित सिंग आणि आई नीलम सिंग असल्याचे स्पष्ट झाले आहे. ती सध्या पाटणा AIIMS मध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. दुसरीकडे, बिहारच्या आकांक्षा सिंगने सादर केलेले कागदपत्र आणि तिचा दावा खोटा असल्याचे आयोगाच्या रेकॉर्डवरून सिद्ध झाले असून बारकोड तपासणीत तिने दिलेला रोल नंबर सिस्टीमशी मॅच झाला नाही.
लोकसेवा आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्पष्ट केले आहे की, काही प्रसारमाध्यमांत एकाच नावाच्या दोन उमेदवारांबाबत चुकीच्या बातम्या पसरत आहेत, मात्र अधिकृत रेकॉर्डनुसार केवळ गाझीपूरच्या आकांक्षा सिंगनेच ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या प्रकरणामुळे UPSC सारख्या पारदर्शक परीक्षेतही फोटोशॉप आणि कागदपत्रांमधील फेरफाराचा वापर करून कशा प्रकारे दिशाभूल केली जाऊ शकते, हे उघड झाले आहे. कोणत्याही निकालाची खातरजमा केवळ नावाने न करता रोल नंबर आणि बारकोडद्वारेच करणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

