उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षेच्या आयोजनात प्रशासकीय अनागोंदी चव्हाट्यावर आली असून, कानपूर आणि प्रयागराजसह पाच जिल्ह्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. परीक्षा केंद्रांची वास्तविक क्षमता न तपासताच प्रशासनाने उमेदवारांना अनिर्बंध प्रवेशपत्रांचे वाटप केले. कानपूरमधील महाराजपूर येथील केंद्रावर केवळ ३९९ विद्यार्थ्यांची आसनक्षमता असताना प्रशासनाने तब्बल ८१९ उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी बोलावले होते. एकाच वेळी क्षमतेपेक्षा दुप्पट-तिप्पट उमेदवार केंद्रावर धडकल्याने आसन व्यवस्था कोलमडली आणि प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. या अभूतपूर्व गोंधळामुळे अखेर प्रशासनाला दोन्ही सत्रांतील परीक्षा तडकाफडकी रद्द करावी लागली. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याची माहिती मिळताच दूरवरून आर्थिक भुर्दंड सोसून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा संयम सुटला. संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्रांचे अतोनात नुकसान करत संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली, तसेच काही ठिकाणी कानपूर-प्रयागराज राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत लाठीचार्ज व बळाचा वापर करून वातावरण नियंत्रणात आणले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून, कर्मचारी निवड आयोगाने आता अधिकृत नोटीस काढून या प्रभावित केंद्रांची फेरपरीक्षा २७ मेपासून घेण्याचे जाहीर केले आहे.

