सुरत: एटीएममधून पैसे काढताना व्यवहार फसला, तरीही खात्यातून १० हजार रुपये वजा झाले. ही रक्कम परत मिळवण्यासाठी एका ग्राहकाने तब्बल ९ वर्षे कायदेशीर लढा दिला. अखेर सुरत ग्राहक न्यायालयाने ‘बँक ऑफ बडोदा’ला जोरदार दणका देत, संबंधित ग्राहकाला मुद्दल १० हजार रुपयांसह ३ लाख २८ हजार ८०० रुपये भरपाई म्हणून देण्याचे ऐतिहासिक आदेश दिले आहेत.
नेमके प्रकरण १८ फेब्रुवारी २०१७ रोजी घडले होते. एका ग्राहकाने सुरतच्या उधना भागातील एसबीआय (SBI) एटीएममधून १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. खात्यातून पैसे कट झाले, मात्र मशीनमधून रोख रक्कम बाहेर आली नाही. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, असा तांत्रिक बिघाड झाल्यास ५ दिवसांच्या आत पैसे परत मिळणे आवश्यक असते. मात्र, वारंवार पाठपुरावा आणि लेखी तक्रार करूनही बँक ऑफ बडोदाने ही रक्कम परत केली नाही. उलट, हा व्यवहार एसबीआयच्या एटीएममध्ये झाल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
ग्राहक न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, व्यवहार यशस्वी झाल्याचा ठोस पुरावा देणे ही बँकेचीच जबाबदारी आहे. आरबीआयच्या २०१९ च्या परिपत्रकाचा आधार घेत न्यायालयाने सांगितले की, अपयशी व्यवहाराची रक्कम वेळेत परत न केल्यास दररोज १०० रुपये दंड आकारला जातो. २४ फेब्रुवारी २०१७ पासून ते निर्णय येईपर्यंतचा विलंब ३,२८८ दिवसांचा ठरला आहे. त्यामुळे दररोज १०० रुपये याप्रमाणे ३,२८,८०० रुपये इतकी मोठी भरपाई बँकेला ३० दिवसांच्या आत अदा करावी लागणार आहे. बँकेने विलंब केल्यास ही रक्कम आणखी वाढू शकते.







