मुंबई :
राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणामुळे सोलापूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहे. १,०२०.५० कोटी रुपयांच्या चार पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन सोलापूर शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित दोन उड्डाणपुलांसंदर्भात विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सुमारे ९.६६० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराभोवती प्रभावी वाहतूक वर्तुळ तयार होईल. सहा प्रवेश आणि निर्गमन मार्गांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५, ५२, १६६ आणि १५० यांच्यात अखंड संपर्क प्रस्थापित होईल. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच प्रादेशिक संपर्कक्षमता वाढून सोलापूरचे धोरणात्मक वाहतूक केंद्र म्हणून महत्त्व अधिक बळकट होणार आहे.
या प्रकल्पाला ३१ मार्च २०२५ रोजी स्थायी वित्त समितीची मंजूरी मिळाली असून, राज्य शासनाकडून जमीन संपादनाचा खर्च उचलण्यात येणार आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय आणि धोरणात्मक पाठबळ दिले असून, प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, रेल्वे, भारत संचार निगम लिमिटेड आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.







