मुंबई: प्रतिनिधी
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे चांदीच्या दराने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आज चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली असून प्रति किलो चांदीची किंमत आता ३ लाख रुपयांच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे. आजच्या व्यवहारात चांदीचा दर सुमारे ३,०५,००० रुपये प्रति किलोच्या आसपास स्थिरावल्याने सर्वसामान्यांसह सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रातील मागणी आणि दागिन्यांसाठी वाढलेली पसंती यामुळे चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. केवळ दागिन्यांसाठीच नव्हे, तर इलेक्ट्रॉनिक आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या वापरामुळे चांदीची मागणी जागतिक स्तरावर वाढली आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत असून सोन्याच्या तुलनेत चांदीने परतावा देण्यात मोठी आघाडी घेतली आहे. गुंतवणूकदारांनी चांदीला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पसंती दिल्याने या धातूच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत. या दरवाढीमुळे लग्नसराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असली, तरी ज्यांनी आधी गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी हा काळ फायद्याचा ठरत आहे.







