मुंबई : कायदा हा भाजप नेत्यांसाठी नसून फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासाठीच आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. सत्ताधारी लोकांनी कितीही लूटमार, बलात्कार किंवा पक्षांतर करून विधीमंडळाच्या कायद्यांचे उल्लंघन केले तरी त्यांच्यासाठी कायदा नाही, असे म्हणत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. खासदार ओम निंबाळकर यांचा ‘सोंगाड्या’ असा उल्लेख करत राऊत म्हणाले की, विरोधी पक्षात असताना ज्या खासदारांना देवेंद्र फडणवीस भेटत नव्हते आणि त्यांच्या विकासकामांवर चर्चा करत नव्हते, त्यांनी पक्षांतर करताच फडणवीस त्यांना समोर बसवून त्यांचे कागद मंजूर करत आहेत, हा थेट घटनेशी द्रोह आहे आणि याच कर्माची फळे त्यांना आता मिळत आहेत. देशामध्ये सध्या ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरू झाले असून फडणवीस दिल्लीत उच्चपदावर जाणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे; पण आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात तरी राहतील का, असे वातावरण मिंध्यांनी (शिंदे गट) निर्माण केले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. ज्या खासदारांनी गद्दारी केली आहे, त्यांनी राजीनामे दिले पाहिजेत आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या कलम १० नुसार त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे; अशा गुन्हेगारांना जर देवेंद्र फडणवीस आपल्या चेंबरमध्ये बसवून चहा-बिस्किटे देत सह्या करत असतील, तर स्वतः फडणवीस हे रामद्रोही आणि घटनाद्रोही आहेत आणि याची किंमत या सगळ्यांना चुकवावी लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.







