कराड: कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्रीच्या सुमारास थरारक दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशन परिसरात दरोडेखोरांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक छेडछाड करून गाडी रोखली आणि प्रवाशांना लुटले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अशी घडली घटना: मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूरवरून पुण्याकडे जाण्यासाठी निघाली होती. मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास रेल्वे मिरज स्थानकावरून सुटली. पहाटे अडीचच्या सुमारास ही रेल्वे शेणोली गावाच्या हद्दीत पोहोचली असता, दरोडेखोरांनी रेल्वेच्या आऊट सिग्नलमध्ये छेडछाड करून तो लाल (बंद) केला होता. सिग्नल मिळाल्यामुळे चालकाने गाडी निर्जन स्थळी थांबवली, याचाच फायदा दरोडेखोरांनी घेतला.
प्रवाशांमध्ये घबराट: रेल्वे थांबताच दरोडेखोरांनी जनरल बोगी क्रमांक एस-३ (S-3) कडे धाव घेतली. प्रवासी गाढ झोपेत असताना खिडक्यांमधून हात घालून लूटमार सुरू करण्यात आली. दरोडेखोरांनी दोन प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन आणि दोन महागडे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेले. प्रवाशांनी आरडाओरडा करेपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाले होते.
तपास सुरू: या धाडसी दरोड्यामुळे रेल्वे विभागात आणि प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निर्जन स्थळी सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून लूटमार करण्याच्या या प्रकारामुळे रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



