रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे होमगार्ड जवानांसाठी “मरीन होमगार्ड” या विशेष सागरी सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या विशेष प्रशिक्षणामध्ये सहभागी होमगार्ड जवानांना समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत बचाव व मदतकार्य कसे करावे, सागरी सुरक्षा यंत्रणा कशी राबवावी, तसेच कयाक नौकानयन (कयाक बोटिंग) यांसंदर्भातील सखोल सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. या आधुनिक प्रशिक्षणामुळे होमगार्ड जवानांची सागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन व संकटसमयी करायच्या बचावकार्याबाबतची क्षमता आता अधिक सक्षम होणार आहे. किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे ठरणार आहे.




