रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत. याच अनुषंगाने रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुरुगवाडा-पांढरा समुद्र परिसरात मोठी कारवाई करत विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. ऋषिकेश संतोष चव्हाण (रा. भैरी मंदिराजवळ, मुरुगवाडा, रत्नागिरी) असे या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून अमली पदार्थासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २२ सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक शहरात नियमित गस्त घालत होते. यावेळी मुरुगवाडा-पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकीजवळ ऋषिकेश चव्हाण हा तरुण पोलिसांना अत्यंत संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेत त्याला ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले ३ ग्रॅम वजनाचे ‘ब्राऊन हेरॉईन’ हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी या अमली पदार्थासह गुन्ह्यात वापरलेली एमएच ०८ बीएल ५५१३ या क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित ऋषिकेश चव्हाण याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या धडक कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, दिनेश आखाडे, भालचंद्र मयेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.



