रत्नागिरी : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाला सोडचिठ्ठी देत दक्षिण रत्नागिरीतील काही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ‘युवा क्रांती सेना’ नावाच्या नवीन पक्षाची स्थापना केली असून, पक्षाचे संयोजक जुनेद बंदरकर यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी राजकीय दिशा स्पष्ट केली. बंदरकर यांनी सांगितले की, कोकणची अस्मिता, स्थानिक लोकांचा स्वाभिमान, रोजगार निर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि तरुणांचे सर्वांगीण सक्षमीकरण या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून हा पक्ष काम करेल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन पक्ष पुढे जाईल, असा उल्लेख त्यांनी केला. ‘युवा क्रांती सेना’ ही केवळ एक राजकीय संघटना नसून कोकणातील जनतेच्या अपेक्षा आणि समस्यांना न्याय देणारे जनआंदोलनाचे व्यासपीठ असेल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या पक्षात कोणत्याही प्रकारची ‘हाय-कमांड’ संस्कृती असणार नाही आणि निर्णय प्रक्रियेत स्थानिक कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकांचा थेट सहभाग असेल, अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली. मनसेमधून बाहेर पडण्याच्या कारणांवर बोलताना बंदरकर म्हणाले की, स्थानिक मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असतानाही प्रत्येक गोष्टीसाठी वरिष्ठांच्या परवानगीची वाट पाहावी लागत होती. मुंबईतील वातानुकूलित कार्यालयातून कोकणची वस्तूस्थिती समजून घेणे आणि येथील समस्यांवर प्रभावी तोडगा काढणे शक्य नाही. त्यामुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि तरुणांच्या समस्या दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला अधिक स्वायत्तता मिळण्याची गरज भासल्याने, सामूहिक निर्णयाने या नवीन पक्षाची स्थापना करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्तेपेक्षा विकास हेच पक्षाचे मुख्य ध्येय असल्याचे सांगत त्यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर विशेष लक्ष दिले जाईल, अशी घोषणा केली. गावांचा सर्वांगीण विकास हाच जिल्ह्याच्या प्रगतीचा पाया आहे, म्हणूनच स्थानिक लोकांच्या विचारांचा आदर करत आणि त्यांच्या सहभागाने निवडणुकीची रणनीती आखली जाईल, असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला पक्षाचे कार्याध्यक्ष सचिन शिंदे, सरचिटणीस शकील गवाणकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दक्षिण रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात ‘युवा क्रांती सेना’च्या स्थापनेमुळे आता नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.



