रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जांभारी गावात मंगळवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली असून, कुंपणासाठी बांबू गोळा करत असताना जमिनीवर लपवून ठेवलेल्या गावठी बॉम्बचा अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत रेश्मा प्रसाद सुर्वे (वय ४७, रा. जांभारी) या महिला गंभीर जखमी झाल्या असून स्फोटाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या डाव्या हाताची पाचही बोटे तुटून त्या रक्तबंबाळ झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा या मंगळवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती प्रसाद सुर्वे यांच्यासोबत घराच्या मागील बाजूस असलेल्या ‘भूताचा बंगला’ परिसरात घराच्या कुंपणासाठी बांबू तोडण्यासाठी गेल्या होत्या. बांबू तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पती प्रसाद हे पाणी पिण्यासाठी घरात गेले असता, रेश्मा जमिनीवर तोडून ठेवलेले बांबू एकत्र करत होत्या; नेमका त्याच वेळी तिथे आधीच लपवून ठेवलेल्या एका गावठी हातबॉम्बला त्यांचा हात लागला आणि जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा प्रचंड आवाज ऐकून पती आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना रेश्मा यांच्या हाताची छिन्नविच्छिन्न अवस्था दिसून आली, ज्यानंतर त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसराची बारकाईने पाहणी केली असता, तिथे जंगली जनावरांची आणि पक्ष्यांची बेकायदेशीर शिकार करण्यासाठी अज्ञातांनी असे अनेक जीवघेणे गावठी बॉम्ब पसरवून ठेवल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत प्राथमिक नोंद करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.





