रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरात विनापरवाना गोवंशीय मांसाची वाहतूक आणि विक्रीसाठी साठा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. लांजेकर नगर येथे २६ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या कारवाईत पोलिसांनी लियाकत शौकत दावत (वय ४८) याला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून सुमारे ५१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे गोवंशीय मांस, एक होंडा अॅक्टिव्हा दुचाकी आणि टाटा व्होल्टास कंपनीचा डीप फ्रीझर असा एकूण १ लाख ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपी हा कोणत्याही वैध परवान्याशिवाय या बेकायदेशीर मांसाची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगून असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध नवीन ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ मधील कलम ३२५ सह ‘महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम, २०१५’ चे कलम ५(ब), ५(क), ९(अ) आणि ‘मोटार वाहन कायदा, १९८८’ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या गोवंशीय मांसाचा पुरवठा आणि साखळीबाबत रत्नागिरी शहर पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.



