राजापूर: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी राजापूर नगरपालिका आणि तहसीलदार कार्यालय प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवून शहरातील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली असून संबंधितांना एकूण ३९७ नोटिसा बजावण्याची कारवाई हाती घेतली आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबविण्यात आली असून, नगरपालिका हद्दीतील धोकादायक झाडांच्या ३७ मालकांना, जीर्ण व धोकादायक इमारतींच्या ५७ मालकांना, तसेच पूर, दरड अथवा अन्य नैसर्गिक संकटांचा धोका असलेल्या आपत्तीग्रस्त भागांतील ३०३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याबाबत सतर्कतेचा इशारा देणाऱ्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या नोटिसांद्वारे नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूरस्थिती किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही हानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन अथवा प्रशासनावर राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



