राजापूर : प्रतिनिधी
राजापूर शहरातील सुरू असलेल्या, मंजूर झालेल्या तसेच प्रस्तावित विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर शासकीय विश्रामगृहात नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासनाची एक विशेष बैठक पार पडली असून, यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारा निधी कधीही कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार सामंत यांनी दिली. या बैठकीत शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून विकासकामांचा दर्जा कायम राखत ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, तसेच शासनस्तरावर मंजूर झालेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती घेऊन आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपये, बहुउद्देशीय सभागृहासाठी ३ कोटी रुपये, मच्छी व मटण मार्केट उभारणीसाठी ३ कोटी रुपये, सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासह संरक्षक भिंतीसाठी १ कोटी रुपये आणि नगर परिषदेच्या मालकीच्या शाळांची दुरुस्ती, तळी स्वच्छता व उद्यानांचे सुशोभीकरण करण्यासाठी ३ कोटी रुपयांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व प्रस्तावित विकासकामांना गती देण्यासाठी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासमवेत विशेष बैठक घेऊन शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन देतानाच आमदार किरण सामंत यांनी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे नमूद केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस नगराध्यक्ष ॲड. हुसेनबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, काँग्रेस गटनेते ॲड. जमीर खलिफे, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या विविध नागरी समस्या व विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.



