पालघर : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विक्रमगड रोडवर असलेल्या टीना रबर कंपनीत एक मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. आज (२४ सप्टेंबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कंपनीची एक भिंत अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माहिती मिळताच वाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या मजुरांची नावे केशव वाळकू गुनगुणा (वय ५५), मीरा जानू गवळी (वय ६०, दोघेही रा. विक्रमगड तालुका) आणि रंजना दिलीप कोंब (वय ३५, रा. वाडा तालुका) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमगडच्या आपटी आणि वाड्याच्या पाली सीमेवर असलेल्या या रबर कंपनीत सकाळी हे मजूर काम करत असताना ही प्राणघातक दुर्घटना घडली. भिंत कोसळल्यानंतर त्यांना ढिगाऱ्यातून लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
या घटनेनंतर टीना रबर कंपनीबाबत स्थानिकांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीत यापूर्वीही अनेक अपघात आणि वादग्रस्त घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी उघड्यावर ठेवलेल्या टायरांना आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर आणि प्रदूषण पसरले होते. याशिवाय, कंपनीतून सतत येणारी दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे आजूबाजूचे ग्रामस्थ अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. पर्यावरण आणि आरोग्याला होणाऱ्या हानीमुळे नागरिकांनी अनेकदा आंदोलने करून ही कंपनी कायमची बंद करण्याची मागणी केली आहे. आजच्या या दुर्दैवी घटनेने कंपनीच्या सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



