नवी दिल्ली: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी ‘नीट-युजी २०२६’ ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा अखेर केंद्र सरकारने आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) अधिकृतपणे रद्द केली आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या आणि काही राज्यांमध्ये पेपर फुटल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तपासाअंती परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आज हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणाचा सखोल तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
या पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्र, बिहार आणि हरियाणा अशा विविध राज्यांशी जोडलेले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. विशेषतः नाशिक आणि राजस्थानमधून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून परीक्षेच्या सुमारे ४२ तास आधीच प्रश्नपत्रिका संशयितांच्या हाती लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या निर्णयामुळे सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असले तरी, प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
रद्द झालेली ही परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार असून त्याच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच ‘एनटीए’च्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केली होती, त्यांना पुन्हा नवीन अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त फी भरण्याची गरज भासणार नाही. जुन्याच नोंदणीच्या आधारावर विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशपत्रे जारी केली जातील. सरकारकडून पुनर्परीक्षेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्रालयाने दिले आहे.







