नवी दिल्ली :
नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर केंद्र सरकारने शनिवार दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे, अशी माहिती कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली आहे. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सीजेपीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर, सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आमच्या मागणीवर सरकारने उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार लवकरात लवकर त्यांना पदावरून हटवेल, अशी आम्हाला आशा आहे.”
या बैठकीत इतर महत्त्वाच्या मागण्यांवरही सकारात्मक चर्चा झाल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. नीट परीक्षेदरम्यान आत्महत्या केलेल्या परीक्षार्थींच्या कुटुंबांना आर्थिक मदत (भरपाई) देण्याचा आणि विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे (एफआयआर) व कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय – या दोन्ही मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य केल्या आहेत. मात्र, जोपर्यंत राजीनाम्याची मुख्य मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे सीजेपीने स्पष्ट केले आहे.

