राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती मिळणार; तांत्रिक कौशल्याचा अजोड आविष्कार
लोणावळा : विशेष प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. हा प्रकल्प राज्याच्या अर्थव्यवस्थेला ७० हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र दिनाचे आणि कामगार दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे भव्य लोकार्पण आज पार पडले.
लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पास ‘मिसिंग लिंक’ पेक्षा ‘कनेक्टिंग लिंक’ संबोधणे जास्त संयुक्तिक ठरेल. अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्याखोऱ्यांत आणि दाट जंगलांमध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलल्याबद्दल त्यांनी एमएसआरडीसी (MSRDC) आणि या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आभार मानले.
कामगारांच्या घामाला सलाम
आज कामगार दिन असल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या हजारो कामगारांचे आणि अभियंत्यांचे विशेष कौतुक केले. या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दिग्गजांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डिकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, एमएसआरडीसीचे अध्यक्ष अनिल गायकवाड, जिल्हा परिषद सीईओ नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते.



