रायगड : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Expressway) आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी प्रोपलीन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या १५ तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे. हा वायू अत्यंत ज्वलनशील असल्याने परिसरात स्फोटाचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गॅस गळती थांबवण्यासाठी NDRF चे पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रात्रभर युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप गळती पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो प्रवासी अन्न, पाणी आणि स्वच्छतेच्या सोयींविना अडकून पडले आहेत. प्रवाशांनी सोशल मीडियाद्वारे आपली अडचण व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.
हायवे पोलिसांनी प्रवाशांना जुन्या मुंबई-पुणे मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत गॅस गळती पूर्णपणे थांबत नाही आणि टँकर बाजूला केला जात नाही, तोपर्यंत द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे.







