रायगड : प्रतिनिधी
मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण उद्या, १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून होणार आहे. राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि अपघातांपासून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा उद्या दुपारी १२:३० वाजता रायगड जिल्ह्यातील खोपोली एक्झिटजवळ, मिसिंग लिंकवरील पूल क्र. १ येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रवाशांसाठी मोठे गिफ्ट: वेळेत ३० मिनिटांची बचत
सध्या मुंबई-पुणे प्रवास करताना खंडाळा घाटातील वळणावळणाच्या रस्त्यामुळे प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या नवीन १३.३ किमी लांबीच्या ‘मिसिंग लिंक’मुळे:
-
मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर ६ किलोमीटरने कमी होईल.
-
प्रवासाच्या वेळेत तब्बल २५ ते ३० मिनिटांची बचत होणार आहे.
-
घाटातील धोकादायक वळणे आणि चढ-उतार टाळले जातील, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल.
प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये:
१. जगातील सर्वात रुंद बोगदा: या प्रकल्पात २३.५ मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात आला असून, त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे.
२. टायगर व्हॅलीतील भव्य पूल: ‘टायगर व्हॅली’मध्ये ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे, जो अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
३. वेग मर्यादा: या नवीन मार्गावर हलक्या वाहनांसाठी १०० किमी/तास तर प्रवासी वाहनांसाठी ८० किमी/तास अशी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
सध्या सुरुवातीच्या टप्प्यात या मार्गावरून केवळ हलक्या वाहनांना परवानगी दिली जाण्याची शक्यता असून, अवजड वाहनांबाबतचा निर्णय प्रशासनाकडून लवकरच घेतला जाईल.



