मुंबई :
मुंबईच्या पवई परिसरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका २५ वर्षीय एअर होस्टेसच्या फ्लॅटमध्ये घुसून एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीने स्वतःला तृतीयपंथी (किन्नर) असल्याचे भासवून घरात प्रवेश मिळवला आणि तंत्र-मंत्राच्या बहाण्याने महिलेला संमोहित (हिप्नोटाइज) करून या घृणास्पद कृत्याला अंजाम दिला. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सूत्रे हलवत १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपी अनिल शिंदे याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल शिंदे हा तृतीयपंथीयाच्या वेशात एअर होस्टेसच्या फ्लॅटवर पोहोचला होता. त्याने महिलेला सांगितले की, तो तिच्या आजारी पतीला बरे करण्यासाठी वाईट नजर काढू शकतो. असे सांगून त्याने तंत्र-मंत्राचा बहाणा केला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्या अंगावर काहीतरी पाणी शिंपडले आणि डोक्यावर हात ठेवला, ज्यामुळे ती संमोहनाच्या अवस्थेत गेली. यानंतर आरोपीने तिला बेडरूममध्ये नेले आणि डोळे मिटून पलंगावर झोपायला सांगितले. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याने महिलेवर अतिप्रसंग केला. मात्र, जेव्हा महिलेला काहीतरी चुकीचे घडत असल्याचे जाणवले आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपी घाबरला.
पळून जाण्यापूर्वी आरोपीने महिलेकडे २०० रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने त्याला पैसे दिले आणि त्यानंतर त्याने तिथून पोबारा केला. तपासात अशीही माहिती समोर आली आहे की, आरोपी आणि त्याचे कुटुंब तृतीयपंथी असल्याचे भासवून भीक मागण्याचे काम करतात.
या घटनेनंतर पीडितेने तात्काळ पोलिसांत धाव घेत आपली तक्रार दाखल केली. पवई पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित तपासासाठी पथके स्थापन केली. पोलिसांनी पवईतील इमारतीपासून ते थेट ठाण्यातील कळवापर्यंतच्या मार्गावरील तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि आरोपीच्या पळून जाण्याच्या मार्गाचा माग काढला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांच्या आतच, बुधवारी पहाटे पोलिसांनी आरोपी अनिल शिंदे याला कळवा येथील एका झोपडपट्टीतून अटक केली. सध्या पोलीस या आरोपीची कसून चौकशी करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



