मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत महायुती सरकारने महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात ही घोषणा केली. या निर्णयानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासह इतर आर्थिक लाभांमध्येही वाढ करण्यात आली असून, जुन्या थकबाकीसह सुमारे ५,६४९ कोटी रुपयांची देणी देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.







